बारामती (प्रतिनिधी) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पवार यांची बिनविरोध निवड झाली.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी आज सकाळी सतीश काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. चर्चेअंती त्यांनी एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊन माघारी घेतली, या निवडीमुळे अजित पवार यांची जिल्हा बँकेत पहिल्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार की ते बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले होते.
जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नरसेवक किरण गुजर यांनी बुधवारी (दि. ८) सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात काकडे यांनी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे.
यासंबंधी काकडे म्हणाले, ’सामाजिक कारणांसाठी मी अर्ज दाखल केला होता. पवार यांच्याशी सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी काही प्रश्न मार्गी लावले, बाकीचे मार्गी लावतो असे आश्वासन दिले. वास्तविक जिल्हा बॅंकेशी काकडे घराण्याची पूर्वीपासून जवळीक आहे. बॅंक स्थापनेमध्ये स्व. मुगुटराव काकडे, स्व. बाबालाल काकडे यांचा सिंहाचा वाटा होता. सहकाराचा ही बॅंक कणा आहे. पवार यांच्यासारखा कणखर नेता तेथे असणे गरजेचे असल्याने मी अर्ज मागे घेतला. मी शेतकऱ्यांसाठी काम करतो. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही’.