“नको त्या’ लोकांचा वावर वाढला
जळोची (वार्ताहर) – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अनधिकृत व्यक्तीचा सर्रास वावर सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी कार्यालयात चोरी झाल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा रामभरोसे झाली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी लेखी अध्यादेश काढून राज्यातील विविध परिवहन कार्यालयातील बाह्यस्रोतद्वारे पुरवलेले कंत्राटी कर्मचारी यांची सेवा संपुष्टात आली असल्याचे आदेश दिले होते. त्यावेळी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन आयुक्तांनी देखील आदेश काढला आहे. त्यांनी परिवहन कार्यालयात अनधिकृत व्यक्तीचा वावर दिसून येत आहे. हे कार्यालय सार्वजनिक कार्यालय आहे. कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त नागरिक, अभ्यागत व प्रतिनिधी कामकाजसाठी येतात. परिवहन कार्यालयामध्ये अनधिकृत व्यक्तीस येण्यास मज्जाव करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने परिपत्रकांन्वये वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, सुरक्षा यंत्रणाच नसल्याने अनधिकृत व्यक्तीचा वावर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यालयातील कक्ष, विभागामध्ये प्रवेश करण्यास कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनधिकृत व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा, सीसीटीव्ही यंत्रणा नियमितपणे कार्यान्वित राहतील, याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची भव्य निर्मिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र त्याच्याच मतदारसंघातील बारामती कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा चालू नसल्याने नागरिक आश्यर्य व्यक्त करीत आहेत. बारामती कार्यालयातील सर्व कक्ष, विभागामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अत्यावश्यक आहे. याबाबतची तक्रारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तक्रारींची उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना समक्ष बोलावून सूचना दिल्या आहेत. तरी सुद्धा परिस्थिती “जैसे थे’च आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चोरी झाली होती. गंभीर घटना घडूनही अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा सुरू केली नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा निधी, ग्रॅड नसल्यामुळे बंद आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचा डीबीआर दुरुस्तीसाठी दिला आहे. साधारणत: महिनाभरात सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करून घेणार आहे.
– संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती.