ओतूर -येथे गोमांसाची चोरटी वाहतूक करणारा बोलेरो पिकअप ताब्यात घेत ओतूर पोलिसांनी सलीम अब्दुल कपाडे, रहीम रईस कुरेशी (रा. मुंबई नालासोपारा) व कादर मुसा शेख (रा. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओतूर पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो टेम्पो क्र. (एमएच 04 केएफ 9325) हा संगमनेर, ब्राम्हणवाडा, ओतूरमार्गे कल्याण दिशेला जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार शुक्रवारी (दि. 14) मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ओतूरच्या ब्राम्हणवाडा रस्ता मोरे चौक येथे पिकअप थांबविली असता त्यात सुमारे एक टन वजनाचे गोमांस मिळून आले.
या बाबत पोलीस शिपाई सागर भीमराव शिंदे यांनी पिकअप चालक, मालकाविरुद्ध ओतूर पोलिसांत फिर्याद दिली. यावेळी सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे जनावरांचे मांस व 6 लाख 50 हजार रुपये किंमतीची पिकअप असा एकूण 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुकुंद मोरे करीत आहेत.