– भाजपचे नेते संजय थोरात यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मंचर – नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना नोटीस पाठवून नवीन कर आकारणी करण्यात येणार आहे, असे नगरपंचायतीने नागरिकांना पाठविलेल्या नोटिसांमध्ये उल्लेख केला आहे. घराचे मोजमाप स्क्वेअर फूट टाकून नवीन कर त्यामध्ये नमूद केले आहे. या अन्यायकारक करवाढीसंदर्भात भाजप नेते संजय थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे.
भाजप नेते संजय थोरात यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, मंचर नगरपंचायतीकडून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात अन्यायकाररीत्या करवाढ करण्यात येणार आहे. तशा नोटिसा नागरिकांना पाठवण्यात आलेल्या आहेत. संबंधित कर आकारणीबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्थानीय अपील समिती अस्तित्वात नसल्याने अशा प्रकारे नवीन कर वाढ करणे अत्यंत चुकीचे आहे.
पूर्वीच्या करापेक्षा अवाढव्य कर आकारणी करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष कर,शिक्षण कर, अग्निशमक कर व स्वच्छता कर हे ही कर अवाच्या सव्वा वाढविले आहेत. या अन्यायकारक करवाढीवर सर्व नागरिकांनी विरोध दर्शविला असून मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झालेल्या आहेत. तरी कृपया राज्यातील इतर नगरपंचायत,नगरपरिषद व महानगरपालिका कर वाढीस दिलेल्या स्थगितीप्रमाणे मंचर नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या अन्यायकारक करवाढीस स्थगिती मिळावी व
आम्हा सर्व मंचरकरांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा करून निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पाठविण्यात आले असून करून अन्यायकारक नियोजित करवाढ रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.