बैलगाडा शर्यतीच्या निर्णयानंतर विविध व्यवसायांतून हक्काचे रोजगार मिळणार
वर्षभरातील-चार-पाच यात्रांमुळे उत्पन्न सुरू
– विशाल करंडे
लाखणगाव – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्याने राज्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये यात्रा-जत्रा सुरू होणार असून, त्यानुसार नियोजन सुरू आहे. पर्यायाने येथील अर्थकारणाला बळ मिळणार आहे.
बैलगाडा शर्यत हा फक्त बैलांच्या शर्यती पुरता विषय मर्यादित नसून हा ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा विषय आहे. बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने याचा फायदा विविध छोट्या व्यवसायांना होणार आहे. बैलगाडा बंद झाल्यानंतर त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना बसला होता.
आता बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने पुन्हा एकदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असून पाळणे, खेळणे, मनोरंजनाची साधने खाद्य पदार्थांचे स्टॉल लावणारे आणि हॉटेल व्यावसायिकांना यात्रेमध्ये फायदा होणार आहे.
वर्षातील जवळपास चार-पाच महिने यात्रा-जत्रा सुरू असतात. शर्यती पाहण्यासाठी दुरवरून बैलगाडा शौकीन येत असतात. या व्यवसायिकांच्या उपजीविकेचे साधन सुरू होणार असल्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाजंत्री व्यवसायालाही चांगले दिवस
बैलगाडा शर्यत बंदीनंतर मोठ्या प्रमाणावर ठप्प झाला होता. प्रत्येक गावात दोन-तीन वाजंत्री ताफे आहेत. प्रति ताफ्यात पाच-दहा कलाकार वादक म्हणून काम करतात.
बैलगाड्यांच्या मिरवणुका तसेच घाटातील वादन यामुळे वादकांना बैलगाडा शर्यती हा हक्काचा रोजगार देणारे ठिकाण होते. या व्यावसायिकांनी उपजिविकेसाठी रोजंदारीचा मार्ग पत्करला होता; परंतु शर्यती सुरू झाल्याने त्याचा फायदा या व्यवसायाला होणार आहे.
सजावटीची विक्री वाढणार
बैलगाडा कारागीर, बैलांची दावी, मोरखी यांची विक्री वाढणार आहे. बैलगाडा बनवणारे वेल्डर, सुतार कामगार यांना काम मिळणार आहे. भंडारा गुलाल विक्रीतही वाढ होणार आहे.
स्पीकर-इलक्ट्रिक घड्याळांची मागणी वाढणार
शर्यतीवेळी आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम लाऊडस्पीकर मंडपवाल्यांच्या माध्यमातून निवेदक करीत असतात, त्यामुळे लाऊडस्पीकरवाले, मंडपवाले, निवेदक या सर्वांनाच सुगीचे दिवस येणार आहेत. त्याचप्रमाणे घाटात पळणाऱ्या बैलांचे सेकंद मोजण्यासाठी असणाऱ्या इलक्ट्रिक घड्याळांची मागणी होणार असून या घड्याळांचा पुरवठा करणारे व्यावसायिकांनाही फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांच्याही मागणीत वाढ होणार आहे.