तळेगाव ढमढेरे -येथील शिक्षक भवन शेजारी प्रदीप पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेकायदेशीर विनापरवाना डी. जे. वाजवल्या प्रकरणी चालक, मालक आणि पार्टी अशा तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वाढदिवसाची वरात पोलीस ठाण्याच्या दारात असे चित्र पहावयास मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीजे मालक निखील गोरक्ष गायकवाड (रा. कळमकरवस्ती, शिक्रापूर) व डीजे वाजवणाऱ्याचे नाव आकाश संजय गायकवाड (रा. धानोरे, ता. शिरूर) आयोजक प्रदीप ज्ञानोबा पानसरे (रा. तळेगाव ढमढेरे, शिरूर) आहे.
तळेगाव येथील शिक्षक भवनच्या मागील बाजूस राहणारे प्रदीप ज्ञानोबा पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण पुणे जिल्ह्यात डीजे वाजवण्यासाठी बंदी असताना विनापरवाना खुलेआम डीजे वाजत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता डीजे चालू असल्याचे निदर्शनास दिसून आल्याने कारवाई करण्यात आली.