भिगवण : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हातील नदीकाठच्या मोठ्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी राबविला जाणारा ’नमामि चंद्रभागा’ या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ भिगवण येथे सरपंच दीपिका क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.
भिगवण गावामध्ये व्यवसाय उद्योग दिवसेंदिवस वाढत असताना सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पाची आवश्यकता निर्माण झाली होती. नमामि चंद्रभागा या अभियानासाठी जिल्ह्यातील 10 हजार लोकसंख्या असणार्या 33 गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मांडवी, कुकडी, वेळ, मुळा मुठा आदी नदीकाठच्या गावांचा समावेश करण्यात आला होता.
भिगवण येथील उजनीच्या पाणलोट क्षेत्रालगत असणार्या जागेत समशानभूमी लगत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये गावातील सांडपाण्यावर प्रकिया करून पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून यामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. 15 महिन्यात सदरच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रकल्प भूमिपूजनावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना भिगवण गावच्या द्रुष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने सदरचे काम मंजूर झाले आहे. या प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होवून घाण पाण्याची समस्या सुटणार आहे.
-दीपिका क्षीरसागर, सरपंच भिगवण
जिल्हातील पहिला प्रकल्प
नमामि चंद्रभागा या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील 33 गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये इंदापूर तालुक्यातील नदीकाठावरील भिगवण आणि पळसदेव या दोन गावांची निवड करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी नदीकाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आणि हि जागा पूरक्षेत्राच्या बाहेर असणे बंधनकारक असल्याने जिल्ह्यातील 33 गावांपैकी भिगवण येथे जिल्ह्यातील पहिला ’नमामि चंद्रभागा’ प्रकल्प उभारण्यात येत आहे