शिडीघाट व बैलघाटामार्गाने भाविकांची रीघ
मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दुुसऱ्या श्रावण सोमवारी पहाटे 5 वाजता पुजाऱ्यांनी विधिवत पुजाऱ्यांनी पूजा करून करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्यात आले. मात्र, रविवारी (दि. 15) आणि सोमवारी (दि. 16) अशा दोन्ही दिवशी भाविक आणि पर्यटक पोलिसांना चकवा देत खांडसमार्गे शिडीघाट व बैलघाटाने कोकणातून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात पहाटे पंचामृत, दही, गरम पाणी, चंदन लेप देऊन देवाला स्नान घालून आणि वस्त्र घालून आरती करून मंदिर बंद करण्यात आले. दुपारी तीन वाजता पंचामृत व चंदन लेप देऊन स्नान-पूजा करून मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. करोनामुळे आणि धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फक्त पुजेकरताच मंदिर उघडले असल्याची माहिती व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे यांनी दिली.
खेड व आंबेगाव तालुक्यातील डिंभे, पालखेवाडी येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चेकपोस्टवर पहारा असताना इतर मार्गावरून भाविक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येत असल्याचे दिसून येते आहे. स्थानिक दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पुणे, मुंबई आणि बाहेर राज्यातून येणारे भाविक-पर्यटक हे भीमाशंकरपर्यंत पोहोचत असून, ही गंभीर बाब आहे. असे पाच श्रावणी सोमवार आले आहेत. पैकी दोन सोमवार झाले आहेत. घोडेगाव व खेड पोलीस असे सुमारे 40 पोलीस उपस्थित होते.सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार जिजाराम वाजे, रेखा बोटे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकित वर्तवले आहे, तरी भाविकांनी सहकार्य करून घरातून भगवान शंकराची पूजा अराधाना करावी. भीमाशंकरकडे येणे टाळून पोलीस प्रशासन व देवस्थानला सहकार्य करावे.
सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट
क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणात भाविक व पर्यटनास “नो एन्ट्री’ आहे. तरी काही भाविकभक्त व हौशी पर्यटक भीमाशंकर परिसरात बिनधास्त मोठ्या प्रमाणावर वावरत आहेत. यावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून, वनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– अनिल लांभाते, उपविभागीय पोलीस अधिकारी