खेडमध्ये जलजीवन मिशन योजनेवरून ऊत
आमदार मोहिते, शरद बुट्टे पाटील समर्थकांकडून जोरदार चढाओढ
अविनाश राळे
आंबेठाण – खेड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 8 कोटी 99 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, अद्याप या कामांना आता फक्त मंजुरी मिळाली आहे सुरू होतील तेव्हा होतील, पण त्या आधीच या कामांच्या मंजुरीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. गावागावांत आमच्या प्रयत्नांनी नऊ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे फ्लेक्स झळकले आहेत. आताशी कामांना मंजुरी मिळाली आहे, प्रत्यक्षात पाणी जेव्हा येईल, त्यावेळी हे राजकारणी काय करतील, या विचारानेच ग्रामस्थांचे डोके हॅंग झाले आहे.
आर्थिक वर्ष 2021-22मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत खेड तालुक्यात एकूण 8 कोटी 99 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये वाकीतर्फे वाडा 78.970 लाख, शिवे 199.97 लाख, गडद 108. 51 लाख, कोरेगाव 133.30 लाख, कुरकुंडी 197.28 लाख, हेंद्रुज 104.83 लाख, कडधे 76.04 लाख एकूण 898. 90 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या मंजुरीवरून खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीपराव मोहिते व भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जलजीवन मिशन हे आपल्या पक्षच्या वरिष्ठांमुळे झाले आहे असे स्टेटस मोबाइलवर तर शिवाय बॅनर, फेक्सबाजीवरून जोरदार श्रेयवाद रंगला आहे. श्रेय कोणीही घ्या पण, विकासकामे करा, अशी गुगली नागरिकांनी टाकली आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगणार असल्याचे निश्चित आहे.
श्रेय केवळ करदात्यांचेच
आमच्या गावात पाण्याचे नियोजन अथवा कुठल्याही प्रकारची योजना कुठल्याही पक्षातून होऊ दे आपल्या घरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी येणार आहे, हेच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे, पण या योजना आम्ही भरलेल्या करातून आम्हाला मिळत असतात, त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांनी याचे श्रेय घेवू नये हे श्रेय केवळ नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांचे आहे हे मात्र नक्की.
आगामी निवडणुकीत कोणाला कौल?
पाणी योजनेच्या श्रेयवादावरून खेड तालुक्यातील जनता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी की अन्य कोणत्या पक्षाला कौल देणार हे आगामी काळात चित्र स्पष्ट होईल; मात्र पाणी योजनेच्या श्रेयावादाचा आखाडा मात्र जोरदार रंगला आहे.