Pune District: वाळेन गावाची बगाड यात्रा उत्साहात

पौड : वाळेण गावच्या डोंगरात वाघजाई देवीचे मूळ स्थान आहे. परंतु भक्तासाठी देवी खाली गावात उतरून आली, अशी अख्यायिका आहे. गावात देवीचे भव्य मोठे मंदिर आहे. वाळेन गावात बगाड यात्रा व देवीचा उत्सव पौर्णिमेला उत्साहात साजरा करण्यात आला.
मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील एकमेव बगाड यात्रा असून पिढयान पिढ्या वंशपरंपागत चालत आली असून आजपर्यंत ती सुरू आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. यात्रेची सुरुवात अखंड हरिनाम सप्ताहाने झाली. सप्ताहात काकडा, पारायण प्रवचन, हरिपाठ,कीर्तन, जागर व अन्नदान केले जाते. सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. यात्रा चित्र पौर्णिमा या दिवशी असल्याने हनुमान जयंती व देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
उत्सवाच्या दिवशी देवीचा महाअभिषेक करण्यात येतो. नंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सुरुवात होते. सायंकाळी काठ्या व पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी ढोल ताशा, संभळ, या वाद्यांचा मिरवणुकीत वापर करण्यात आला.
बागडासाठी लाकूड हे बार्पे गावच्या परिसरातून आणण्यात आले. बगाडाची लांबी ही चाळीस फूट असून बगाडाच्या गळाचा मान हा साठे कुटुंबीयांकडे आहे. यावर्षी दीपक राघू साठे यांना लावण्यात आला होता. बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी गर्दी केली होती.





