चेअरमन सत्यशिल शेरकर यांची माहिती.
ओझर : नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप.शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यावतीने दिला जाणारा हंगाम २०२२-२३ चा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला
नवी दिल्लीत शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, उत्तर प्रदेशचे गन्नामंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, नॅशनल फेडेरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्व संचालक मंडळ सदस्य आणि अधिकारी वर्गाने तो स्विकारला असल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. याप्रसंगी साखर उद्योगातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारांविषयी अधिक माहिती सांगताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की,कै.वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली. श्री विघ्नहर कारखान्यास यापुर्वीही अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व.सोपानशेठ शेरकर यांचा शेतकरी हित जोपासने व पारदर्शक कारभार याच धर्तीवर विघ्नहर कारखान्याची वाटचाल सुरु असून मिळालेल्या या पुरस्काराने विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले की, विघ्नहर कारखाना गाळप क्षमतेचा पूरेपूर वापर करुन जास्तीत जास्त ऊस गाळप करताना संपुर्ण ऊसाची नोंदणी संगणीकृत केल्याने ऊस तोडणीचे नियोजन काटेकोरपणे होत असल्यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत होत असल्याने विघ्नहरला उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना शेरकर म्हणाले की मागील वर्षी कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले व ३० (के एल पी डी )वरुन १०० (के एल पी डी )क्षमतेने इथेनॉल प्रकल्प सुरु केला.अतिशय यशस्वीपणे या प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉलचे ९५ लाख लिटर चे उत्पादन घेतले. कारखान्याची गाळप क्षमता वाढविणेचे दृष्टिने कारखाना विस्तारीकरणाचे काम अतिशय जोमाने चालू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विघ्नहर कारखान्याने ऊस लागवडीचे धोरण जून-२०२४ पासून सुरु केले असून कारखान्यामार्फत ऊस विकास अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात असल्याचे ते म्हणाले. या अभियानांर्तगत ऊस उत्पादक शेतकर्यांाना उधारी तत्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जात आहे. ऊस लागवड व कारखान्याकडे ऊसाची नोंद झालेनंतर प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष ऊस उत्पादकांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकर्यां ना ऊस पिकातील नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व ऊस पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती होणेसाठी कारखाना स्वखर्चाने व्हीएसआय आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस उत्पादकांमध्ये प्रति एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्याची भावना वृध्दींगत होण्याकरीता प्रति एकरी १०० ते ११० मे.टन ऊस उत्पादन घेणारे ऊस उत्पादक शेतकरी तसेच प्रतिएकरी १११ मे.टन त्यापुढील ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवुन गौरविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदा पाऊस समाधान कारक होत असून शेतकऱ्यानी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी असे आवाहन शेरकर यांनी केले.