बारामतीत पंचायत समितीची सोडत : इच्छुकांचा उद्या फैसला
बारामती – जिल्हा परिषद गट आणि बारामती पंचायत समितीच्या 14 गणांतील आरक्षण सोडत दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिर, नवीन प्रशासकीय भवनसमोर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार काढणार आहेत. या सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांच्या भवितव्याचा फैसला राजकीय दिशा ठरविणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रारुप मतदार यादी दि. 18 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर दि. 22 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. यादीवर द्यावयाच्या हरकती, सूचना तहसील कार्यालयात मुदतीत सादर कराव्यात.
प्राप्त हरकतीवर निर्णय घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दि. 29 जुलै असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी व केंद्रनिहाय मतदार यादी (दि.8) ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीस तालुक्यातील नागरिकांनी दि. 13 जुलै रोजी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन, तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.
झेडपीत नाही तर पंचायत समितीत ‘रस’
बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट- गण पुनर्रचनेनंतर सात जिल्हा परिषद गट, 14 पंचायत समितीचे गण झाले आहेत. माळेगाव नगरपंचायतीची निर्मिती झाल्यानंतर आता पुनर्रचनेत एक गट आणि दोन गण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी अनेक मोठ्या गावांतील दिग्गजांनी तयारी केली आहे. यात आरक्षण पडल्यास झेडपीला नाही तर पंचायत समितीला उमेदवारी द्या, अशी मानसिकता तयार केली आहे. बारामती तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार हे दोन्ही दरडीवर हात ठेवून आहेत.