पुणे जिल्हा: शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

इनामगावातील घटनेत पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

शिरूर – न्हावरे- इनामगाव- तांदळी- आढळगाव महामार्गावर शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले नाही, त्यात मोबदला नाही. परस्पर शेतकऱ्यांच्या शेतातून रस्त्याचे काम पोलीस बळाचा वापर करून मनमानीपणे होत आहे. असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्याने आज शासन व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

जालिंदर जगन्नाथ मचाले (रा. इनामगाव, ता. शिरूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शिरूर तालुक्‍यातील इनामगाव येथील पेट्रोल पंपाजवळ आरएसबी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराने यंत्रसामग्री, पोलीस बंदोबस्त घेऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. याच संताप मचाले यांनी व्यक्‍त केला. रस्त्यासाठी बाधित जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून या रस्त्यावरील विविध शेतकऱ्यांनी आठ रिटयाचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.

यावर 24 फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे. त्यानंतर या रस्त्याचे काम करा. आम्हाला आमचा मोबदला द्या असे शेतकरी जालिंदर जगन्नाथ मचाले व संपत विठ्ठल मचाले हे शेतकरी सांगत असताना ठेकेदार कुठली गंभीर घेत नाही. हे लक्षात आल्यावर शेतकरी जालिंदर जगन्नाथ मचाले हे आक्रमक झाले. त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून जालिंदर मचाले व संपत मचाले या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

या भागातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला मागत आहेत. कुठली जमीन भूसंपादन केल्याचे कागदपत्र यांच्याकडे नसताना केवळ महसूल प्रशासन, पोलीस यांना हाताशी धरून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कुठलाही राजकीय पुढारी, आमदार, माजी आमदार, खासदार याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नाही, असा आरोप या शेतकऱ्यांनी यावेळी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.