ओतूर – पिंपळगाव जोगे ता. जुन्नर येथील धरण पाणलोट क्षेत्रात परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यावर्षी या पाहुण्यांना या ठिकाणी येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला आहे. हजारो मैलांचा प्रवास करून अगदी नित्यनेमाने हे पक्षी याठिकाणी दरवर्षी येत असतात. गेल्या सात-आठ वर्षापासून या पक्षांची विविध रूपे पाहायला, अनुभवायला मिळतात. जगभरात फ्लेमिंगो पक्षांच्या सहा प्रजाती आढळून येतात. यापैकी ग्रेटर व लेझर या दोन प्रजाती भारतात आढळतात.
फ्लेमिंगो हा पक्षी पाण्यात राहणारा पानपक्षी आहे. या पक्ष्याचा अधिवास धरण, तलाव, नद्या, खाड्या, जलाशये अशा ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. चिखलातील शेवाळ हे या पक्षाचे मुख्य अन्न आहे. पाण्यातील तळाशी असणारे चिखलातील शेवाळ मिळवण्यासाठी त्याच्या मानेत, पायात अनुकूल असे बदल दिसून येतात. पाण्यात उभे राहता यावे म्हणून त्याच्या पायाची रचना दोन फुटापर्यंत असते. पायातील नखांमध्ये कातडीचा पातळ पडदा आढळून येतो. त्यामुळे तो चिखलात देखील सहजपणे चालुन आपले अन्न गोळा करू शकतो.
फ्लेमिंगची मान ही पायाप्रमाणेच लांब असते. त्यामुळे पाण्यातील अन्न शोधून काढणे व उडताना शरीराचा समतोल साधण्यासाठी या उंच मानेचा त्याला उपयोग होतो. आपल्या शरीराची स्वच्छता करायला देखील या मानेचा उपयोग होतो. त्याची चोच गुलाबी रंगाची व बाकदार असते. त्यावर काळसर रंगाची छटा दिसते. त्याची चोच इतर पक्षांपेक्षा वेगळे आहे. हा पक्षी आपली मान खाली करून तो चिखलावर सरकत पुढे चालतो. त्यामुळे त्याच्या चोचीची रचना अशी वेगळी केली आहे.
त्याने मान खाली केली की चोच अलगद चिखलावर टेकते. त्यातून चिखल, पाण्यातून तो अन्नघटक चोचीने शोषून घेतो. चिखलातील अन्नघटक शोधण्यासाठी हा पक्षी चिखलात आपल्या पायांची हालचाल करून विशिष्ट असा नाच करत असतो. त्याचे हे नृत्य पाण्याच्या तळाशी असणारे अन्नघटक मिळवण्यासाठी असते.