पुणे जिल्हा । निनावी संदेश आला अन्‌ बालविवाह रोखले

जुन्नरच्या बांगरवाडी, निमगिरीतील घटना

बेल्हे/जुन्नर -एका निनावी संदेशामुळे बांगरवाडी, निमगिरी (ता. जुन्नर) येथे होणारे बालविवाह रोखण्यात पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद आणि जिल्हा माहिला बालविकास अधिकारी अश्‍विनी कांबळे यांना यश आले आहे.

जुन्नरसारख्या प्रगत तालुक्‍यात बालविवाह होत असल्याचे उघड झाल्याने अजूनही समाजामध्ये बालविवाह होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाल विवाह प्रतिबंधक कायदे आणि बालविवाहाचे दुष्परिणाम यावर चर्चेला उधाण आले आहे. ग्रामीण भागांमध्ये बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्याने बालविवाह कायदा न बोलण्याचा वायदा पालकांनी करायला हवा अशी प्रतिक्रिया समाजातून आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांना जुन्नर तालुक्‍यातील बांगरवाडी येथे बालविवाह होणार असल्याचा एक निनावी संदेश प्राप्त झाला. तत्परतेने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी बेल्हे व बांगरवाडी येथील ग्रामविकास अधिकारी व आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार यांना होणाऱ्या घटनेची माहिती दिली.

बोरी शिरोली (ता. जुन्नर) येथील एका कुटुंबातील मुलगी 17 वर्षांची असतानाच तिचा विवाह केळेवाडी (ता. संगमनेर) येथील मुलाशी ठरवण्यात आला होता. हा विवाह बांगरवाडीतील वेद ओंकार मंगल कार्यालयात होणार होता.

विवाह 28 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता लावणार होते. त्याआधी त्यावर तत्परतेने बेल्हे ग्रामविकास अधिकारी एस. एन. बनकर, बांगरवाडीचे अजित कुंभार, सरपंच जालिंदर बांगर, निलेश बांगर, पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या सतर्कतेमुळे होणारा बालविवाह वेळीच रोखण्यात आला.

आळेफाटा पोलिसांनी मुलीच्या वडिलांकडून मुलींची अठरा वर्षे पूर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही, सर्वतोपरी सांभाळ करेल, मुलीला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास देणार नाही व लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही, अन्यथा मी कारवाईला सामोरे जाईल असे लिहून घेण्यात आले.

दरम्यान, निमगिरी येथेही 17 वर्षीय मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संरक्षण अधिकारी जुन्नर, स्थानिक ग्रामसेवक, जुन्नर पोलिसांच्या तत्परतेने बालविवाह रोखण्यात यश आले. यावेळी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे पालकांकडून हमीपत्र घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

पथक त्या ठिकाणी जाऊन ग्रामसेवकाच्या मदतीने वेळीच विवाह रोखला. नागरिकांनी सतर्क राहून वेळीच असा प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. बाल विवाह करणे हे कायद्याविरुद्ध आहे तसेच मुलीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. मुलीच्या वडिलांना समज देण्यात आली आहे.
– मधुकर पवार, पोलीस निरीक्षक आळेफाटा

पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांचे पत्र आल्याने तात्काळ आम्ही मंगल कार्यालयात जाऊन विवाह रोखला. मंगल कार्यलयाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

– अजित कुंभार, ग्राम विकास अधिकारी बांगरवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.