पुणे जिल्हा । संसर्ग वाढला तरी कोविड सेंटर नाही

सोमेश्‍वरनगर परिसरात राजकीय अनास्था कारणीभूत

सोमेश्‍वरनगर -करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि प्रसार झपाट्याने वाढत असून तो आता बारामती तालुक्‍यातील ग्रामीण भागात जाणवू लागला असून गावांमध्ये अनेक रुग्ण बाधित सापडत आहेत. समृद्ध परिसरातील राजकीय नेत्यांची अनास्था याला कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

बाधित सापडलेल्या रुग्णांसाठी तालुकास्तरावर कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. पण पश्‍चिम भागामध्ये असणारी गावे व वाड्या- वस्त्या नागरिकांना स्थानिक पातळीवर सुविधा मिळत नसल्याने त्यांची परवड होत आहे. सोमेश्‍वरनगर परिसर आर्थिकदृष्ट्‌या सधन आहे. कोविड सेंटरसाठी जागा खूप आहेत. पण एकानेही हात वर केला नाही. मात्र सोमेश्‍वरनगर येथील उद्योजक हेमंत घाडगे यांनी कोविड सेंटरसाठी स्वतःचे मंगल कार्यालय देणार असल्याचे जाहीर केले. हेमंत घाडगे यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

बारामती आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच माळेगाव, मोरगाव आणि सोमेश्‍वरनगर येथे करोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष तथा रामराजे सोसायटीचे मार्गदर्शक पुरुषोत्तम जगताप यांनी रामराजे जगताप मंगल कार्यालय हे कोविड सेंटर होणार असल्याचे जाहीर केले. तर पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा तयार आहे.

मात्र सोमेश्‍वरनगर येथे कुठेही जागा उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणी कोविड सेंटरचे काम रखडत आहे. राज्यात रुग्णांना बेड उपलब्ध होणे ही आता मुश्‍किल झाले असून पॉझिटिव्ह रुग्णांना आपल्या घराच्या जवळच कोविड सेंटर असावे, अशी मागणी सोशल मीडियावर एका व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सुरू असताना स्थानिक उद्योजक हरिओम उद्योगसमूहाचे प्रमुख हेमंत घाडगे यांनी त्यांच्या ओंकार मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर उभारावे म्हणून तयारी दर्शविली आहे. पुणे जिल्ह्याचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.