मंचर – आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी गावचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असून ग्रामपंचायत निवडणुकीत उपोषणकर्त्यांचा पराभव झाल्यामुळे हे आरोप जाणीवपूर्वक केले जात असून गावची व गावातील जबाबदार व्यक्तीची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वाळुंजवाडी गावचे सरपंच नवनाथ वाळुंज व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत त्यांनी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना घोडेगाव येथे सोमवार, दि. १ रोजी निवेदन देऊन केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार सरपंच व ग्रामसेवक यांनी गावच्या विविध विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावातील नितीन गणपत वाळुंज व निलेश निवृत्ती लोंढे या दोन तरुणांनी केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी उपोषणास बसले आहेत. मात्र, या तरुणांनी केलेले आरोप हे चुकीचे असून त्यांनी केलेल्या आरोपामुळे गावची व गावातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींची बदनामी होत आहे.
हे दोन तरुण नितीन वाळुंज व निलेश लोंढे यांनी प्रसारमाध्यमातून गावची तसेच जबाबदार व्यक्ती सरपंच, ग्रामसेवक यांची बदनामी सुरू केली आहे. हे दोघे गावात राहत नसून ते भोसरी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. यातील उपोषणकर्ते नितीन वाळुंज हा सरपंच पदासाठी पदाच्या निवडणुकीत पराभूत झाला होता,
तर निलेश निवृत्ती लोंढे यांच्या भावाची पत्नी निवडणूक प्रक्रियेमध्ये पराभूत झालेली असून त्याच सूड भावनेतून गेल्या दोन वर्षांपासून ते विविध ठिकाणी माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत अर्ज करून मिळालेल्या माहितीचा योग्य अभ्यास न करता त्याचा सोयीनुसार अर्थ लावून प्रसारमाध्यमातून नाहक त्रास देण्याचे काम करत आहेत. सध्या त्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याची पोस्ट सोशल मीडियाद्वारे टाकली असून त्यात त्यानी बिनबुडाचे आरोप केले आहेत.
आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट…
केलेल्या आरोपांची पंचायत समिती आंबेगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली असून यात कुठल्याही प्रकारचे तथ्य आढळले नसून या तरुणांनी केलेले आरोप हे जाणीवपूर्वक व पराभव झाल्याच्या मानसिकतेतून केले आहेत. गावच्या विकास कामांमध्ये बाधा निर्माण करणारे, अशा वृत्तीला आळा बसावा म्हणून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.