पुणे -“मराठा आरक्षण वाचवा,’ “आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नका,’ “मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या,’ एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फ्लेक्स आणि पोस्टर निदर्शने करण्यात आली. गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेऊन ठिकठिकाणी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मोजक्याच व्यक्तींच्या सहभागात हे आंदोलन करण्यात आले. नाका-तोंडाला मास्क लावून घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी आंदोलनात शिस्तबद्धता दिसून आली.
या आहेत मागण्या –
– मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे घटना तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलावीत.
– मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत सुरू ठेवावे.
– न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी विशेष आर्थिक मागास प्रवर्गातील जे शैक्षणिक प्रवेश झाले आहेत, त्यांना न्याय मिळावा. जर पहिल्यापासून प्रक्रिया राबवायची असेल, तर विद्यार्थ्याना प्रवेशापासून मुकावे लागेल.
– या विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करावेत. तसेच विशेष आर्थिक मागास प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना ज्या सवलती आहेत त्या सुरू ठेवाव्यात.
– राज्य लोकसेवा आयोगाने विशेष आर्थिक मागास प्रवर्गाच्या ज्या निवड जाहीर केलेल्या आहेत, त्या संरक्षित कराव्यात.
– 2014 च्या आरक्षणाअंतर्गत ज्या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या, त्या 2018 च्या कायद्याने संरक्षित केल्या होत्या. त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यातून मार्ग काढावा.
– समांतर आरक्षणाबाबत 19 डिसेंबर 2018 चा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्याने बाधित झालेल्या राज्य सेवेतील उमेदवारांना शासन सेवेत सामावून घ्यावे.
– समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी निर्माण करण्यात आलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ठप्प करण्यात आली असून, तिला भरघोस आर्थिक निधी, मनुष्यबळ देऊन ती गतिमान करावी.