प्राथमिक अंदाजानुसार उमेदवारांची चाचपणी सुरू
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध
5 गट, 10 गण होणार असल्याने उमेदवार वाढणार
अमोल बनकर
सासवड – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यामध्ये निवडणुकांचे पडघम आता जोर धरू लागले आहेत याच धर्तीवर पुरंदर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत. पुरंदर तालुक्यातील राजकीय हालचालींना सध्या वेग मिळत असल्याचे पहावयास मिळते आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती त्याचबरोबर सासवड व जेजुरी नगरपरिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून सध्या गट, गण व प्रभाग हे अद्यापपर्यंत निश्चित झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण नव्याने तयार होणार आहेत. तर दोन्ही नगरपरिषदांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने त्याही प्रभागांचे प्रभाग रचनेचा कार्यक्रम अपूर्ण असल्याने प्राथमिक अंदाजानुसार राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गावोगावी आपल्या कार्यकर्तेची जुळवाजुळव सुरू केली असून गुप्त बैठका घेण्यासाठी जोर दिला आहे. शिवतारे यांची लग्न सोहळे, यात्रा, आखंड हरिनाम सप्ताहात हजेरीवर भर दिला आहे.
भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी देखील गावोगावी आपल्या कार्यकर्तेच्या भेटी गाठीला सुरुवात केली असून स्वतंत्र निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. गंगाराम जगदाळे यांचा तालुक्यामध्ये दांडगा संपर्क असल्यामुळे भाजपा या निवडणुकीत चमत्कार दाखवणार का याकडे मतदारांचे लक्ष आहे.
———–
कॉंग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हे निश्चित झाले नसल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्य कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केलेली नसल्याचे पाहवस मिळते. यामुळे कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणिक झेडे पाटील यांनी आपली भूमिका सध्या गुलदस्त्यात ठेवली आहे.
———–
आमदार जगतापांना शह देण्याची तयारी
सासवड नगरपरिषदेमध्ये सध्या कॉंग्रेसच्या जनमत विकास आघाडीचे प्राबल्य असल्यामुळे या जनमत विकास आघाडीला शह देण्यासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते यांच्याकडून नव्याने लोकमत विकास आघाडी तयार करण्यात आली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तरी यासाठी अनेक ठिकाणी उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाली असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, जेजुरी नगरपरिषदमध्ये कॉंग्रेसने स्वतंत्र पॅनल उभा केला तर हीच लोकमत विकास आघाडी जेजुरी नगरपरिषदमध्ये निवडणूक लढवणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.