नारायणगाव : कृषी विज्ञान केंद्राने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्यांना जोडण्याचे काम केले. शिवनेरी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचा सिंहाचा वाटा असून शिरपेचातील मानाचा तुरा असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. कार्यक्रमात ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्काराचे वितरण व लकी ड्रॉ विजेत्यां सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदोरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेट मेंबर व प्राचार्य डॉ. संजय चाकणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजयराव कोलते पाटील, कार्यवाह रवींद्र पारगावकर, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, सुजित खैरे, प्रकाश पाटे, शशिकांत वाजगे, आनंद कुलकर्णी, अरविंद मेहेर, तानाजी वारुळे, डॉ. संदीप डोळे, एकनाथ शेटे, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. राहुल घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणालेकी, स्वतःचे विश्व निर्माण करण्याची बळीराजाच्या मनगटात ताकद आहे. आणि ती ताकद देण्याचा उपक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होत आहे. संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकर्यांच्या हक्काची बाजू मांडण्यासाठी तुमचा आवाज बनून सदैव कार्यरत राहील. विज्ञान आणि तंत्रज्ञान नाण्याच्या ज्ञानाच्या दोन बाजू असल्या तरी विज्ञान जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करत नाही, तोपर्यंत तो केवळ एक चमत्कार राहतो आणि जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतो तेव्हा त्यामध्ये फरक पडतो असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष अनिल मेहेर यांनी सूत्रसंचालन मेहबूब काझी, सुनील ढवळे यांनी तर रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.
शेतकर्याला याची गरज नाही
शेतकर्याला पीएम किसान निधीची गरज नाही, कर्जमाफीची गरज नाही, फुकट विजेची गरज नाही तर आमच्या कांद्याला, दुधाला, सोयाबीनला, कपाशीला, ऊसाला योग्य भाव देण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.