दोन तासांनंतर आग आटोक्यात : 6 लाखांचे नुकसान
भोर – भोर तालुक्यातील महुडे खुर्द (माळेवाडी) येथील शेतकरी शिवाजी सोपान बदक यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घरासह संसारपयोगी साहित्य आणि धान्य जळून खाक झाले. ही घटना (दि.8) सकाळी घडली.
ग्रामविकास अधिकारी एन. पी. राऊत, तलाठी दिनेश कपले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महुडे खुर्द माळेवाडी येथील शेतकरी बदक हे शेतात कामासाठी गेले होते. घरात कोणीही नव्हते. साडेबाराच्या सुमारास घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. ग्रामस्थांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केले होते. आगीची तीव्रता वाढल्याने अग्नीशामक दलाची गाडी बोलवली. बंब व ग्रामस्थांच्या सहकार्याने दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. आगीत कोणती जीवितहानी झाली नाही.
आगीत घरात नुकसान झालेली भांडी- 15 हजार, कपडा 6 हजार, तांदूळ 100 किलो, गहू 60 किलो, ज्वारी 40 किलो, लाकडी वस्तू 10 हजार, घर 2 लाख 30 हजार, कडबा, भाताचा पेंढा, गवत असे 31 हजार, जनावराचा रतीब 3 हजार 300 रुपये, कांदा 2 हजार पाचशे, रोख रक्कम 28 हजार, असे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी प्रत्यक्षात मात्र, 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी शहाजी कुमकर, सरपंच आकाश कुमकर, गणपत जावळे, सदाशिव कंक, अर्जुन कुमकर, नथुराम कुमकर, लक्ष्मण कुमकर, भरत कुमकर, निवृत्ती कुमकर, सुदाम गोळे, रामचंद्र कुमकर, दत्तात्रय कुमकर, भीमसेन दानवले, चंदर कुमकर, शेखर देशपांडे, संतोष शिंदे, शाम जेधे, नामदेव बदक , राजेंद्र कंक, दीपक शिंदे, विठ्ठल सणस, शंकर कुमकर तरुण, जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामविकास अधिकारी एन. पी. राऊत व तलाठी दिनेश कपले, कोतवाल सुनील जेधे यांनी पंचनामा करून अहवाल भोर प्रशासनास पाठवला आहे.