पुणे – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी-पेंढार गावात बिबट्याच्या हल्ल्यात सुजाता ढेरे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जुन्नर वनविभागातील या वर्षी मार्च महिन्यापासून झालेला हा सातवा मृत्यू आहे. सन २००१ नंतर बिबट्याच्या हल्ल्यात यावर्षांत सर्वाधिक माणसांचे मृत्यू झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
आम्ही बिबट्याचा शोध आणि पकडण्याची मोहीम सुरू केली आहे, त्यासाठी आम्ही पिंपरी-पेंढार आणि लगतच्या परिसरात ४० पिंजरे आणि ५० कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. बिबट्याला शोधण्यासाठी थर्मल ड्रोनचाही वापर केला जात आहे, अशी माहिती जुन्नर वनविभागातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ढेरे यांच्या सोयाबीनच्या शेतात स्वत: बसून काम करत असताना घडली. शेजारी ऊसाच्या मळ्यात बिबट्या लपून बसला होता. बिबट्याने ढेरे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि घटनास्थळापासून सुमारे १०० फूट फरफटत नेले आणि ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढेल तपास सुरू केला. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर वनविभाग
बिबट्याच्या हल्ल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पिंपरी – पेंढार गाव आणि लगतच्या परिसरात शोध आणि पकड मोहीम सुरू आहे. या ऑपरेशनसाठी आम्ही ट्रॅप कॅमेरे लावले आहेत, पिंजरे आणि थर्मल ड्रोनचा वापर बिबट्याला शोधण्यासाठी केला जात आहे. सर्व मानक कार्यप्रणाली पाळल्या जात आहेत. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही लोकांना सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.