देऊळगाव राजे : -मलठण येथील मेंढपाळ रंगनाथ काशिनाथ देवकाते यांच्या सुमारे 85 मेंढ्या मागील आठ दिवसांत अज्ञात कारणाने मृत झाल्या आहेत. यात या मेंढपाळाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी मलठण येथे भेट देऊन मेंढपाळ देवकाते यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते, तालुका अधिकारी डॉ. अविनाश जाधव, सभापती हेमलता फडके, उपसभापती विकास कदम, माजी सभापती ताराबाई देवकाते, सरपंच हनुमंत कोपनर, नवनाथ थोरात यांनी मेंढपाळ रंगनाथ देवकाते उपस्थित होते.
यावेळी महेश्वर युथ फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष संभाजी खडके, उपाध्यक्ष महेश गडदे, अशोक हंडाळ, संदीपान वाघमोडे, श्रीकांत हंडाळ, सचिन वायसे यांनी मेंढपाळ रंगनाथ देवकते यांना आर्थिक मदत मिळावी, असे पत्र पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे व गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांना दिले.
तसेच आई सेवाभावी संस्थेचे अध्यक्षा शुभांगी धायगुडे यांनी देवकाते यांना आर्थिक मदत म्हणून दहा हजार, माजी चेअरमन नवनाथ वाघमोडे यांनी पाच हजार रुपये दिले.