Pune District: बांधकाम व्यावसायिकाची ३६ एकर जमीन बळावली

सासवड : पुरंदर तालुक्यातील देवडी येथील रॉयल पुरंदर प्रोजेक्टचे प्रमुख व बांधकाम व्यावसायिक यांना तीन कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ३६ एकर जमीन जबरदस्तीने बळकवली आहे.
फिर्यादी भाऊसाहेब नारायण भोसले, (वय ५२ बांधकाम व्यवसाय, रा. ऊरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी अनिल तुकाराम मोहीते, योगेश शिवाजी आव्हाड, राकेश पारीख, गणेश सुनील मोहिते, विरेंद्र राजू मोहिते (सर्व रा. वाकड पुणे) गौरव देवीदास अतरंदे (रा. गणेशखिंड, औंध) व इतर साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित आरोपी यांनी आपसांत संगनमत करून बांधकाम व्यावसायिक भाऊसाहेब भोसले यांच्या देवडी येथील रॉयल पुरंदर प्रोजेक्टसच्या साईट ऑफिस तसेच सिटी टॉवर, ढोले पाटील रोड बंडगार्डन येथील ऑफिसमध्ये वेळोवेळी समक्ष भेटून व मोबाइल फोनद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून पिस्तुलाचा धाक दाखवून १० एकर जमीन नावावर करण्यास भाग पाडून संशयित आरोपींकडील १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने सही घेऊन त्यांची जग्वार गाडी जबरदस्तीने घेतली. फिर्यादी व त्यांच्या कंपनीचे खोटे कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के तयार करून खोटी सही करून त्याआधारे श्री वारणा सहकारी बँकेकडून १ कोटी १० लाख रुपये कर्ज मंजुर करून घेतले.
खंडणी स्वरूपात विनामोबदला जमिनीचे दस्त बनवून घेत फिर्यादीची एकूण ३६ एकर जमीन जबरदस्तीने बळकवली आहे. त्यांना वेळोवेळी धमकावून २.५ कोटी रूपये, स्वतःच्या बँक खात्यावर हस्तांतरित करून ३ कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहे.





