निमोणे : गुनाट (ता. शिरुर) येथील प्रगतशील ऊस व कांदा उत्पादक बाजरी पिक स्पर्धेच्या उत्पादनात राज्यात तिसरा क्रमांक मिळविलेले योगेश गाडे यांनी या वर्षी 60 गुंठ्यात 172 टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे गेल्या वर्षी सुद्धा 100 टन एकरी उत्पादन घेण्यात यश आले आहे.
विविध पिकाचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा पोत महत्वाचा असून जमिनीत सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य नसल्याच मत योगेश गाडे यांनी व्यक्त केले. शेणखताची कमरतता असून जमिनी सुपिक राहण्यासाठी फक्त पाचट हे माध्यम चांगले आहे. योग्य पद्धतीने पाचट व्यवस्थापन केल्यास सेंद्रिय खत उपलब्ध होते व जमिनीची सुपिकता वाढते कर्ब वाढत आहे.
योगेश गाडे हे कांदा, ऊस, बाजरी, गहू अशी पिके घेत असून, जमिनीच्या सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी दरवर्षी ऊसातील पाचट न जाळता पाचट व्यवस्थापन करत आहेत. पाचट व्यवस्थापन बाबत कृषी विभागाने वेळोवेळी केलेली जनजागृती व मोहीम स्वरूपात केलेले प्रचार प्रसिद्धी यामुळे प्रेरणा मिळाली. तसेच कृषी सहायक जयवंत भगत आणि अवधूत कृषी सेवा केंद्राचे मालक विठ्ठल भगत यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन, यामुळे पिकाचे उच्चतम उत्पादन घेत असल्याची माहिती योगेशनी दिली.
शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील एक आदर्श कांदा उत्पादक म्हणून योगेशकडे बघितले जाते. निर्वी, करडे, शिंदोडी, निमोणे परिसरात कांदा लागवड या विषयावर व्याख्यान देऊन योगेश युवकांना मार्गदर्शन करत आहे, ऊस पाचट कधीच जाळू नये, असे आवाहन त्याने केले आहे.