शिक्रापूर/ कोरेगाव : सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दैनंदिन व औद्योगिक वाहतूकीमुळे दररोज वाहतूक कोंडी चौकात पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकाने बुधवार (दि.१२) दिवसभरात १०५ बेकायदा गाळे व टपऱ्या सपाट केल्याने भाजी विक्रेते, वडापाव, चायनिज, स्वीटहोम गाळ्यांनी महामार्गावरील चौक व्यापला गेला होता. परिसर आणि मार्ग खुला झाल्याने सणसवाडीतील महामार्गाने मोकळा श्वास घेतला.
सणसवाडी येथे दोनशेंहून आशिक लहान मोठ्या कंपन्या, मोठ्या संख्येने कामगार व स्थानिक राहत आहेत. दररोज रांजणगाव ते कारेगावपासून ये- जा करणारी औद्योगिक वाहतूक तसेच पुणे संभाजीनगर महामार्ग वाहतूकमुळे सणसवाडी चौक सतत वाहनांच्या वर्दळीत राहतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुख्य चौकात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते, वडापाव, चायनीज, स्वीटहोमसह टपऱ्यांना पेव फुटल्याने चौक अरुंद होत एकसारखी वाहतूक कोंडी होत होती.
यावर प्राधिकरणसह बांधकाम विभाग आणि शिक्रापूर पोलीस यांनी जेसीबी, पोकलेन, क्रेन, वीस मंजुरांसह तीनही विभागाचे दहा अधिकारी, पंधरा कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. मुख्य चौकातील महामार्गापासून दोन्ही बाजूंना ३० ते ५० फूट इतक्या अंतरातील सर्व अतिक्रमण काढून टाकले. विशेषतः दिवसभर कारवाईदरम्यान गावातील कुणीच हस्तक्षेप न करत एकही राजकीय पदाधिकारी कारवाईकडे फिरकला नाही. मुख्य चौक साफ होऊन वाहतूक कोंडीही कमी झाली आहे.
टपरी व गाळे पीएमआरडीएच्या रडारवर
पुणे अहिल्यानगर महामार्गावर दररोज हजारो वाहने व लाखो प्रवाशांच्या वेळेशी खेळ करणाऱ्या महामार्गावरील सर्व टपऱ्या व गाळे यांना पीएमआरडीएची अर्थात पुणे महानगर विकास प्राधिकरणची परवानगी आवश्यक आहे. ती नसेल तर अशा कारवाया आता नियमित होणार असल्याने कमी किमतीत गाळे उभे करुन ते भाड्याने देत, महामार्गाला वेठीला धरणे आता यापुढे कुणीही करु नये, असे आवाहन देखील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.