शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्दिष्टापेक्षा अधिक प्रतिसाद
पिरंगुट (वार्ताहर) – माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित सूर्यनमस्कार उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 1 लाख 68 हजार 984 सूर्यनमस्कार पूर्ण केले गेले आहेत.
शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये 80 हजार सूर्यनमस्काराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे 1 लाख 68 हजार 984 सूर्यनमस्कार पूर्ण झाले. गुगल मीट व झूम ऍपचा वापर करून आयोजित या ऑनलाइन उपक्रमांमध्ये 80 शाळा आणि महाविद्यालयातील 13 हजार 468 विद्यार्थी आणि 1 हजार 535 शिक्षकांनी सहभाग घेतला. यानंतर गुगल फॉर्मद्वारे सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांची नोंद घेतली गेली.
उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने संस्था पातळीवर सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामार्फत करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. विद्या पठारे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कार्यालयीन अधीक्षक सिताराम अभंग, किरण देशपांडे, संतोष पठारे, शाम भोसले आदींनी परिश्रम घेतले. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
म्हाळसाकांत विद्यालयाची आघाडी
आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात सर्वात जास्त 33 हजार 130 सूर्यनमस्काराची नोंद झाली, तर अण्णासाहेब मगर महाविद्यालय – हडपसर, पिरंगुट इंग्लिश स्कूल – पिरंगुट, श्री शहाजी हायस्कूल – सुपे यांनी दहा हजारांपेक्षा जास्त सूर्यनमस्काराची नोंद केली.