पुणे- जिल्ह्यातील 626 कोविड रुग्णालयांतील 16 हजार 293 फंक्शनल बेडच्या प्रमाणात आज 6 हजार 530 रेमडेसिविर इंजेक्शनसचा पुरवठा करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांचे बेड्सच्या प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत आहे.
हॉस्पिटलमार्फत रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणण्यासाठी चिठ्ठी देण्यात येते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होते. हे इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध नाही. परंतु रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शन देण्यात आल्यामुळे त्याचा काळाबाजार होण्यास चालना मिळत असल्याचे आढळले आहे.
त्यामुळे कोणत्याही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांना तशी चिठ्ठी देऊ नये. अशी बाब आढळून आल्यास संबंधित हॉस्पिटलला केला जाणारा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे.