राजगुरूनगरच्या विद्यार्थ्यांची ‘भीमाशंकर’ला भेट

प्रत्यक्ष भेटीतून जाणली वनअौषधी वनस्पतींची माहिती : ४५ जणांचा सहभाग

राजगुरुनगर  -हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भीमाशंकर अभयारण्य परिसरामधील वन औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी; तसेच तालुक्‍यातील भुरूपे, वसाहती, शेती, जलप्रणाली यांचा प्रत्यक्ष अभ्यास करावा, भौगोलिक संकल्पना आणि प्रत्यक्ष अनुभव या भेटीतून घेता यावा या उद्देशाने खेड तालुक्‍यातील चास, कमान, डेहणे, कारकुडी, भीमाशंकर आणि कोंढवळ परिसरात क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्र भेटीत भूगोल विषयाचा विशेष स्तरावर अभ्यास करणारे सुमारे 45 विद्यार्थी सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आदिवासी लोक आपल्या आजूबाजूला मुबलक प्रमाणात असणाऱ्या हिरडा, बेहडा, सोनकी, बेडकीचा पाला, जंगली आद्रक, सफेद कुडा, वेल्या करंज, नळकंद, अश्वगंधा, सफेद मुसळी, बारदोळा, हाडसांधी इ. औषधी वनस्पतींचा उपयोग आपले आरोग्य टिकवण्यासाठी आणि अगदी स्वस्तात आजार बरे करण्यासाठी कसा करून घेतात याची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेतली व काही वनस्पतींचे संकलनही केले.

या वनस्पतींची माहिती स्थानिक नागरिक सखाराम बाणेर, सुरेश दाधवड, गणपत वाजे, सुरेश भोजणे यांनी दिली. याशिवाय या क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांनी चासजवळील रांजणखळगे, चासकमान धरण, कळमोडी धरण क्षेत्राला भेट दिली. तसेच कळमोडी धरणाजवळील एकलहरे गावाजवळील पॉलिहाऊसला भेट देऊन येथे विकसित केलेल्या गुलाब फुलांच्या विविध जातींचा अभ्यास केला.

सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर विविध प्रकारच्या फुलांचे आणि जैवविविधतेचे निरीक्षण केले. भीमाशंकर जवळील कोकण कडा, कोथळागड, आंबेगाव तालुक्‍यातील घोड नदीवरील कोंढवळ येथील धबधबा, घळई, रांजणखळगे, विविध भू-आकार व खडकांविषयी माहिती जाणून घेतली. या क्षेत्र भेटीचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिलीप मुळूक, प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. डी. एम. मारकड, प्रा. गणेश मोढवे यांनी केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी प्रोत्साहन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)