वाघोली (प्रतिनिधी) : कोरोना रोगातून बरे झाल्यानंतरही अनेकांना काही व्याधींना सामोरे जावे लागत आहे, यावर वेळीच उपचार व औषधे मिळावेत तसेच शारीरिक उपचार बरोबरच मानसिक ताण कमी करण्यासाठी चांगला सल्ला मिळावा या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, आरोग्य भारती आणि सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प व वाघोली डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली असल्याची माहिती या उपक्रमाचे मुख्य समन्वयक कृष्णकांत सातव यांनी दिली आहे.
या ओपीडी चे उद्घाटन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वाघोली डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.रघुनाथ रामकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सुरेश भाडळे, रेश्माताई गणेश पाचारणे, सुजाता कृष्णकांत सातव, विजयराव शिवले, डॉ.विनोद सातव, संजय कड, डॉ. अर्चना भागवत, डॉ. दिनकर देसाई, राजेश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली मधील सर्व नागरिकांनी या निःशुल्क आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना पहिल्या अथवा दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग झाला असेल अशा वाघोली परिसरातील नागरिकांनीसुध्दा या ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णकांत सातव यांनी केले आहे.