सेवेतील अधिकाऱ्यांना आवरेना लाचेचा मोह

जिल्ह्यात एकापाठोपाठ लाखचोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात : प्रतिमा मलीन

पुणे – जिल्ह्यात एकापाठोपाठ एक प्रशासनातील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत आहे. नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना “लाचेचा मोह’ आवरत नसल्यामुळे या घटना वाढत असून, त्यामध्ये प्रशासनाची आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मोहाला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठोस पाऊल उचल्याचे, जुन्नर तालुक्‍यातील गटविकास अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईतून दिसून येते. या कारवाईमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, लाचेचा ला…ला’ म्हणतानाही अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकांची आणि देशाची सेवा करण्याचे व्रत घेऊन प्रशासनात रूजू होताना घेतलेली “शपथ’ अधिकारी खुर्चीवर बसताच काही दिवसांमध्ये विसरतात. त्यांना “खुर्ची आणि त्या खुर्चीखालून मिळणाऱ्या “लाचेचा मोह’ आवरत नाही. या मोहापायी अधिकारी स्वत:ची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असल्याच्या घटना अनेकवेळा उघडकीस आल्या आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याचे प्रमाणही अधिक असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिध्द करण्यात येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे प्रशासनाला लाचेच लागलेल “ग्रहण’ कसे सुटणार हा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. हे ग्रहण सोडवण्यासाठी कणखर, शिस्तबध्द आणि लाचेला थारा न देणाऱ्या अधिकाऱ्यांची खरी गरज आहे.

कोणत्याही अधिकाऱ्याच्या गैरवर्तणुकीमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत असेल तर त्या संबंधीत अधिकाऱ्याला त्याची गंभीर किंमत मोजावी लागेल. त्यामुळे त्यांनी वेळीच सुधारावे. नागरिकांना तत्पर सेवा द्याव्यात. तसेच येत्या काही दिवसांत तालुक्‍याला सरप्राईज व्हिजीट देणार असून, त्यामध्ये मुख्यालयातील आदेशाचे पालन झाले नसेल किंवा आर्थिक व्यवहारात अनियमितता दिसून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
-सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.

दरम्यान, जुन्नर तालुक्‍यातील गटविकास अधिकाऱ्याला ग्रामसेविककाडे पैसे मागणे चांगलेच महागात पडले आहे. त्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशीत दोषी आढळताच तत्काळ त्या अधिकाऱ्यांना पदावरून पायउतार केले. एवढच नव्हे तर संबधित अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही सर्व पुरावे सादर केले. या कारवाईनंतर लाचेच्या मोहात असलेल्या अधिकाऱ्यांना वचक बसावा, लाच घेताना दहा वेळा विचार करावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी फतवाच काढल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले.

या फतव्यामध्ये ज्या सर्वसामान्य नागरिकापासून एक अधिकारी म्हणून नावारूपाला आलेल्या अधिकाऱ्याची जबाबदारी काय याची जाणीव करून दिली आहे. तसेच अधिकाऱ्यांना लागलेला लाचेचा मोह हा स्वत:ची, कुटुंबाची आणि प्रशासनाची प्रतिमा धुळीला मिळवणे आहे. त्यामुळे यापुढे लाच घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात मांढरे यांनी ठणकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)