विवाह पत्रिका देण्यासाठी निघालेल्या वधूचा अपघाती मृत्यू

लग्नाच्या तारखेलाच आली दशक्रिया करण्याची वेळ

बेल्हे -स्वतःच्या विवाहाच्या पत्रिका देण्यासाठी पोखरी (ता. पारनेर) येथून आळेफटा (ता. जुन्नर) येथे दुचाकीवर निघालेल्या युवतीला बेल्हे (ता. जुन्नर) येथे टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवतीचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शनिवारी) सकाळी साडेदहा वाजता बेल्हे येथील उपविजकेंद्रासमोर झाला. तर आपघातप्रकरणी आळाफाटा पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, लग्नाच्या तारखेलाच दशक्रिया विधी आल्याने गावात हळहळ व्यक्‍त होत आहे.

जया नाथा हांडे(वय 21) असे मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. आळाफाटा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदर सतीश घाडगे म्हणाले की, जया हांडे ही पोखरीहून अहमदनगर-कल्याण महामार्गाने आळेफाटा येथे दुचाकी (एमएच 16 बीएस 8996) ने निघाले होती. ती बेल्हे येथील उपविजकेंद्रासमोर आली असता त्याचवेळी नारायगाव येथून आलेल्या टेम्पो (एमएच 16 एई 3050) ने जयाच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली यात तिचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बेल्हे पोलीस नाईक नरेंद्र गोराणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला. आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहितीसह पाहणी केली.

आळेफाटा पोलीस ठाण्यात बेल्हे पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर यांनी खबर दिल्यानंतर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आळेफाटा पोलीसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. सहायक फौजदार सतीश घाडगे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.