पुणे : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आता तालुका स्तरावरच दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यातील असंख्य दिव्यांग विद्यार्थ्यांसह नागरीकांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलमाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
राज्यभरात तालुका स्तरावर १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेषज्ञांची समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीद्वारे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरे आयोजित करून प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्राचा निपटारा करावा, असे निर्देश सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालयांना आरोग्य विभागाने दिले आहेत.
दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते. हे ऑनलाइन प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत २१ प्रवर्गातील अपंग व्यक्तींना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत अपंगत्व तपासणी, निदान करून व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) देण्यासाठी तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.