पुणे: चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल बावधन शाखेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . बालवाडी ते १० विच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला.
महाराष्ट्रात मोठी संतपरंपरा आहे. विठ्ठल रखुमाई च्या गजराने संपूर्ण महाराष्ट्र ज्येष्ठ आणि आषाढ महिना दुमदुमत असतो. वारकरी देहभान हरपून या सोहळ्यात सहभागी होतात. आमच्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा अतिशय उत्साहात दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. छोट्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख अशा पालख्या तयार केल्या होत्या. शाळा पताका, झेंडे , रांगोळ्या यांनी सजली होती. विठ्ठ्ल रखुमाईची अतिशय सुबक अशी मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केली होती.
राजेंद्र बांदल आणि रेखा बांदल यांच्या हस्ते आरती आणि पूजा करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच विकास गुरव, योगेश सोनवणे आणि प्रदीप साठे आदि मान्यवर उपस्थित होते. आरती नंतर हरिनामाच्या गजरात पालखी शाळेतून बापूजी बुवा मंदिरात मुलांनी नेली. आपले सर्व वारकरी मस्तकी टिळा लावून, हातात टाळ, मृदूंग घेऊन पालखीत सहभागी झाले होते. यावेळी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला आणि रिंगण घातले.
प्लास्टिक मुळे होणाऱ्या हानीची कल्पना असावी आणि प्लास्टिक चा वापर बंद करावा म्हणून मुलांनी फलकांद्वारे दिंडीत ‘Save Plastic, Save Environment ‘ चा संदेश दिला. बापूजी बुवा मंदिरात इयत्ता ६ वि ते ९ विच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. शाळेतील शिक्षकांनी मुलांना वारीविषयी माहिती सांगितली. शाळेतील एका छोट्या विद्यार्थिनीने अतिशय उत्स्फूर्तपणे विठ्ठल भक्तीची गोष्ट सांगून मुलांना खिळवून ठेवले. याप्रसंगी माननीय बांदल यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आठवीच्या विद्यार्थिनींनी केले.
दिंडीच्या या कार्यक्रमाने संपूर्ण शाळा भक्तिरसात न्हाऊन निघाली. अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने मुलांना भारतीय परंपरेची ओळख होते आणि शाळेत उत्साही वातावरण राहते. मुलांमधील विविध कलागुणांना वाव मिळण्यासही असे कार्यक्रम उपयोगी पडतात. या कार्यक्रमासाठी माननीय संस्थापक राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल आणि मुख्याध्यापिका रुचिरा खानवलकर यांचे मार्गदर्शन लाभले.