पुणे –ई-नकाशा कार्यक्रमांतर्गत राज्यातील पुणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा जिल्ह्यांतील जमिनींच्या नकाशांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. हे नकाशे डिजिटल साईन झाल्यावर संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. उर्वरित 28 जिल्ह्यांतील जमिनींच्या नकाशांचे डिजिटायझेशन करण्यासाठी मान्यता दिली असल्याचे थोरात यांनी सांगितले.
विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना थोरात यांनी ही माहिती दिली. भू-नकाशा या संकेतस्थळावर जनतेस मिळकतींची माहिती स्वत: शोधता यावी याकरिता परिपूर्ण संकेतस्थळ निर्मितीचे काम विचाराधीन आहे. डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत तालुका स्तरावरील तहसिलदर कार्यालयातील जुने फेरफार, जुने सातबारा, खाते उतारा आदी दस्ताऐवज आणि भूमि अभिलेख कार्यालयातील टिपण, आकारफोड, पत्रक, गुणाकार बुक, आकारबंद, एकत्रिकरण स्कीम, शेत पुस्तक आदी अभिलेखांचे स्कॅनिंग काम चालू आहे. राज्यातील एकूण 35 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झालेले असून त्यापैकी 19 जिल्ह्यांचा डेटा साठविण्यात आला आहे. “महाभूमी’ या संकेतस्थळावर ही माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती थोरात यांनी दिली.