कात्रज -दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर राजमाता भुयारी मार्गालगत पंपिंग स्टेशनची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेला रस्ता गेल्या दहा-बारा दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. खोदकाम झालेल्या ठिकाणी पाणी गळती व चिखल झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून भुयारी मार्गात वाहतूक कोंडी होत आहे.
कात्रज-देहू रस्ता राष्ट्रीय महामार्गावरून या ठिकाणी सेवा रस्ता असल्याने वाहने भुयारी मार्गाजवळ आल्याने सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ठिकाणी खोदकामात गॅस पाइपलाइन फुटली होती, पंपिंग स्टेशनपासून वडगाव पंपिंग स्टेशनकडे पाइपलाइन जोडण्याकरिता जेसीबीद्वारे रस्त्याच्या बाजूने खोदण्यात आले होते. मात्र, काम झाल्यानंतर खोदलेल्या खड्ड्यामध्ये वरच्यावर मात्र दगड गोटे व माती टाकण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काम झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्ता पूर्ववत करून त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट किंवा डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र, हलगर्जीपणामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे.
राजमाता भुयारी मार्गालगत पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे काम सुरू होते. काम पूर्ण झाले आहे की नाही, याची माहिती कळविण्यात आलेली नाही. तशी माहिती घेऊन काम पूर्ण झाले असेल तर त्या ठिकाणी विभागामार्फत डांबरीकरण लगेच करून घेण्यात येईल. – दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग, मनपा