मार्केट यार्ड – सेवा ज्येष्ठते नुसारनियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपीकांची भुसार विभाग प्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच तापले असून आमदार माधुरी मिसाळ यांच्यामाध्यमातून राज्य शासनापर्यंत याची धग गेली आहे. त्यातच आता व्यापाऱ्यांना प्रशासनावर अविश्वास दर्शवित, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे तर संबंधीतास भुसारप्रमुख पदावर कार्यरत कसे ठेवले, असा प्रश्न उपस्थित करीत चौकशी होइपर्यंत संबंधीताचे निलंबन करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणी सुरूवातीला पणन खाते प्रमुखांकडे तक्रार आली, पणन संचालक विकास रसाळ यांनी सदर प्रकरणात सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांना चौकशीचे आदेश दिले त्यानंतरही चौकशी कामात वेळकाढूपणा व चालढकलपणा होत असल्याने जोपर्यंत चौकशीचे न्यायलयीन काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कनिष्ठ लिपीकास कार्यरत ठेऊ नये. अशी मागणी व्यापााऱ्यांनी लावून धरली आहे.
चौकशी लांबविण्याबाबत व कारवाईस टाळाटाळ होत असल्याबाबत भुसार प्रमुखाला जाणीवपूर्वक पाठीशी घातले असल्याचे आरोप आता व्यापारी करीत आहेत. भाजप पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनीही सदर प्रकरणात पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे भुसार प्रमुखाची तातडीने चौकशी करून कारवाई करा अशी, लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे पणन संचालक चौकशीबाबत आता तरी गंभीर दखल घेणार का. हे पाहावे लागेल.
“भुसार प्रमुखाविरोधात अनेक व्यापाऱ्यांनी चेंबरकडे तक्रारी केल्या असून अनेक व्यापाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. सदर प्रकरणी पणन संचालकांकडे चेंबरकडून लेखी तक्रार करण्यात आली असून चौकशी सुरू असताना भुसार प्रमुखाला त्यापदावर ठेऊ नये. अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. ” – रायकुमार नहार, अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर
“व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असून दहशत केली जात आहे. व्यापाऱ्यांची तक्रार असताना फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला भुसार प्रमुख पदावर काम करण्यास नेमणे यातून बाजार समितीच्या कारभारावरच प्रश्न निर्माण होतात. आम्ही लेखी तक्रार केली आहे. त्यास पदावर ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी.” – प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर