Pune : ‘विकास आराखडा’ मुद्दा महत्त्वाचा ठरणार

महापालिका निवडणूक; मूलभूत सुविधांबाबत 23 गावांतील नागरिकांत रोष कायम

नऱ्हे, (संतोष कचरे) – पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नऱ्हे परिसरात कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. मुळातच 2017 मध्ये 11 गावांच्या समावेशानंतर पालिकेत नव्याने आणखी 23 गावे घेण्यापूर्वी या गावांचा विकासआराखडा तयार करावा त्यानंतरच पालिकेत समावेश करावा, अशी मागणी होत होती.

या 23 गावांचा विकासआराखडा “पीएमआरडीए’ने तयार केला. परंतु, त्यावर आलेल्या सूचना, हरकतींवर अद्यापही निर्णय न होता ती प्रक्रिया थंडावली आहे, असे असताना ही 23 गावे पालिकेत समाविष्ट करून घेण्याची चूक महापालिकेने केली. परंतु, मूलभूत सुविधा पुरविण्यातही पालिका कमी पडत असल्याने नऱ्हे तसेच अन्य गावांतूनही पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्‍त केला जात आहे. पालिका निवडणुकीत समाविष्ट नव्या गावांचा विकासआराखडा हा मुद्दा परिणामकारक ठरू शकतो.

पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश होताना नऱ्हे गावाचाही समावेश करण्यात आला. परंतु, या गावात सध्या कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाचा विकासआराखडा तयार करून पालिकेने गाव ताब्यात घ्यावे, तो पर्यंत ग्रामपंचायतीद्वारे कामकाज सुरू ठेवावे तसेच आगामी पाच वर्षे ग्रामपंचायतीप्रमाणेच कर आकारावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.

मात्र, महापालिका प्रशासनाने घाई-गडबड करीत ग्रामपंचातीचा कारभार ताब्यात घेत, दफ्तरही जमा करून घेतले. त्यामुळे गावातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत गेल्याने कचऱ्या सारखी समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नऱ्हे गाव महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी ग्रामपंचायती मार्फत 8 गाड्या व 40 ते 45 कर्मचाऱ्यांमार्फत कचऱ्याचे योग्य नियोजन करून गाव स्वच्छ ठेवले जात होते. परंतु, महापालिकेकडून असे कुठलेही नियोजन करण्यात येत नाही. कचऱ्याच्या गाड्यांची संख्या कमी पडत असून त्या वेळेवरही येत नाहीत, त्यामुळे रस्त्याकडेला उकीरडे साचले आहेत. यातून अस्वच्छता निर्माण झाली असून गावात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नऱ्हे गावातील अभिनव कॉलेज परिसर, स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल सेवा रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. पुणे महानगरपालिकेने योग्य नियोजन करून या रस्त्यावरील कचरा लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून जाहीर करण्यात (दि.2 ऑगस्ट) आलेल्या नव्या 23 गावांच्या विकास आराखड्याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर नऱ्हे गावासह अन्य गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनीही सूचना, हरकती घेतल्या. परंतु, यावरील सुनावणी अद्यापही झालेली नसल्याने ही प्रक्रियाच थंडावली असून गावांच्या विकास आराखड्याच काय झाले? असा प्रश्‍न नऱ्हे गावातील स्थानिक आजी-माजी प्रतिनिधी करू लागले आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरण आयुक्‍त सुहास दिवसे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. विकास आराखड्यावरील सूचना व हरकतींवर तातडीने सुनावणी घेण्यात येणार असून येत्या दहा दिवसांत शासन स्तरावर समिती नेमून त्यामार्फत सुनावणी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. अन्य समस्याही सोडविल्या जातील.
– सागर भूमकर, माजी उपसरपंच, नऱ्हे

नऱ्हे गावाचा विकास आराखडा तयार असेल तर प्रशासनाचे स्वागतच आहे. पीएमआरडीकडून यापूर्वी दोन भागात हा आराखडा ऑनलाइन प्रसिद्ध केला असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची “हार्ड’ कॉपी सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. शिवाय, आराखडा तयार असेल तरी त्याची अंमलबजावणी करायला हवी.
– दत्तात्रय पिसाळ, उद्योजक, नऱ्हे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.