पुणे : हवामानातील बदल आणि तापमानात होणारी वाढ ही डेंग्यू पसरवणाऱ्या डासांसाठी पोषक ठरत आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, कमी वेळेत अधिक पाऊस पडणे आणि जून ते सप्टेंबरदरम्यान ६० टक्के आर्द्रता असणे, या परिस्थितीत डेंग्यू आजार डोके वर काढतो, असे आमचे निरीक्षण आहे.
यानुसार डेंग्यूविषयी पूर्वअंदाज देण्याची प्रणाली आम्ही विकसित केली असून, काही दिवसांत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवामान वैज्ञानिक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केले.
भवताल फाउंडेशन, आयसर- पुणे, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संशोधन प्रोग्रॅमच्या संयुक्त विद्यमाने आयसर (पुणे) येथे १८- १९ जानेवारी रोजी हवामान बदल जाणून घेताना या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आयसर-पुणे येथील डॉ. जॉय मॉन्टेरो, प्रा. छावी माथूर, प्रा. बीजॉय थॉमस, आयआयटीएममधील संशोधक आदिती मोदी, स्मार्ट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख, भवताल फाउंडेशनचे संस्थापक अभिजित घोरपडे, समन्वयक वैभव जगताप यांनी मार्गदर्शन केले.
वाढते तापमान आणि चढ- उताराच्या मान्सूनमुळे डेंग्यू वाढत आहे. डेंग्यूशी संबंधित मृत्यू भविष्यात वाढू शकतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टीने डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतात; परंतु विकसित केलेले मॉडेल उष्ण दिवसांमध्ये होणारी डासांची वाढ डेंग्यूच्या भविष्यातील बदलांवरील प्रभाव दर्शविते, असे डॉ. कोल म्हणाले.
देशमुख, प्रा. मोंटेरो, प्रा. थॉमस, मोदी, जगताप यांचेही भाषण झाले.