पुणे- वडगावशेरी मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून बापूसाहेब पठारे यांच्यातच थेट सामना रंगला होता. या निवडणूकीत गावकी-भावकीचे राजकारण महत्त्वाचे ठरले. अखेर बापूसाहेब पठारे यांचाच गुलाल उधळण्यात आला. आता पठारे यांना मतदार संघाच्या विकासासाठी ध्यास घेऊन त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकारही घ्यावा लागणार आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीतील अंतर्गत पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत नाराजी सुरुवातीपासून चव्हाट्यावर आली होती. त्यामुळे कोणता झेंडा हाती घ्यायचा, कोणत्या उमेदवाराचे काम करायचे, कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक गोंधळातही पडले होते.
त्यात भाजपनेही या मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी दावा ठोकला होता. मात्र, नंतर त्यातील हवा निघाली. प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल पाहता सन २००९ नंतर तब्बल १० वर्षांनी बापूसाहेब पठारे यांच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ पडली आहे.
मतदार संघातील विविध भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत प्रश्नांचा सामना करावा लागतो. विविध ठिकाणचे नाले अनधिकृतपणे भरात टाकून बुजविण्यात आलेले आहेत. त्याचा फटका नागरिकांना पूरपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात बसतो. मतदार संघातील लोकसंख्या व वस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात वाढलेलला आहे.
त्या तुलनेत ड्रेनेज लाइनची व्याप्ती व विस्तारही वाढविण्याची गरज आहे. महत्त्वपूर्ण मोठे विकास प्रकल्प उभारावेच लागणार आहे. नागरिकांना नियमितपणे मुबलक पाणी मिळायला पाहिजे. मतदारसंघातील अवैध धंदेही बंद झाले पाहिजेत. यासाठी आमदार म्हणून पठारे यांना पुढाकार घ्यावाच लागणार आहे. विकासकामांच्या आड कोणी राजकारण आणूनही चालणार नाही, अशी प्रतिक्रिया या मतदारसंघातील जनता व्यक्त करत आहे.
हे आहेत स्थानिक प्रश्न
– सातत्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
– रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे
– पूरस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक
– पावसाळी वाहिन्यांचे जाळेही विकसित करणे
– अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारी थांबवणे