पुणे : अर्थव्यवस्था वाढीसाठी बँकेतील ठेवी उपयुक्त असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डी. एस. सावकार अध्यासन व विद्यापीठाचा वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती व आव्हाने या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, जीवन साधना गौरव पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. मुकुंद तापकीर, डी. एस. सावकार अध्यासन प्रमुख डॉ. अशोक कांबळे, प्रा. डॉ. जी. शामला, प्रा. डॉ. अनिल करंजकर, बीएमसीसी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.
बँकेकडे ठेवींच्या रूपात समाजाकडून जमा झालेला अनुत्पादक पैसा गरजू व्यावसायिक व उद्योजकांना उपलब्ध करून उत्पादकतेकडे वळविला जातो. त्या दृष्टिकोनातून बँकेतील ठेवींची गरज त्यांनी विविध उदाहरणे देऊन विशद केली. या वेळी त्यांनी देशातील त्रिस्तरीय बँकिंग व्यवस्थेची कार्यपद्धती व त्याला अनुसरून स्थापन झालेल्या नाबार्डसारख्या संस्थांची भूमिका स्पष्ट केली. जनधनसारख्या योजनेमुळे ७८ टक्के लोकांची बँकेतील खाती वाढली; परंतु त्यातील ३८ टक्के निष्क्रिय असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांना ठेवीदार वित्तीय साक्षरतासारख्या उपक्रमात सहभागी होण्याचा सल्ला दिला.
भारतीय लोकसंख्येच्या सरासरी वयोमानाचा विचार करता भारतातील युवक देशाच्या आर्थिक विकासात निर्णायक भूमिका बजावू शकतात, असेही अनास्कर यांनी सांगितले. सायबर सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. पराग काळकर यांनी सांगितले. अध्यासन प्रमुख डॉ. अशोक कांबळे यांनी डी. एस. सावकार स्मृती व्याख्यान आयोजित करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली.