पुणे – तुटपुंजी रक्‍कम घेण्यास ठेविदारांचा नकार

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात न्यायालयात जमा असलेली 6 कोटी 65 लाख रुपयांची तुटपुंजी रक्‍कम घेण्यास ठेविदारांनी नकार दिला आहे. यातून प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्‍कम येणार, काय साध्य होणार, असे प्रश्‍न त्यांनी विचारले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे.

या प्रकरणात डीएसकेची ठाणे येथील संपत्ती विकल्याचे 6 कोटी 65 लाख रुपये ठेवीदारांना परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, असे यापूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार त्या रकमेचे सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटप करण्याबाबत प्रस्ताव आहे. मात्र, 6 कोटी 65 लाख रुपये सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटले तर प्रत्येकाला केवळ 2 हजार रुपये मिळतील. लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या ठेविदारांना या रकमेचा काय फायदा होणार? असा प्रश्‍न ठेवीदारांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केला. तसेच, संबंधित रक्‍कम घेण्यास नकार दिला.

या प्रकरणातील आरोपी डीएसके, हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी आणि डीएसके डीएल कंपनी व इतर कंपन्यांचे नावे कोणताही बोजा नसलेल्या आणि तत्काळ विक्री योग्य अशा मालमत्तांची यादी तयार करण्यात येऊन ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या मालमत्ता विक्रीमधून जमा होणारा पैसा हा न्यायालयाकडे जमा करून त्याचे ठेविदारांना समप्रमाणात वितरण करण्यात यावे, असे सूचविण्यात आले आहे. डीएसके आणि कुटुंबियांच्या बॅंक खात्यात असलेले सुमारे 12 कोटी रुपये पोलिसांनी गोठविले आहेत. ती रक्‍कम देखील यापुढील काळात ठेविदारांना देण्याचा प्रस्ताव आहे, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.