पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली ३४ गावे, शहरातील वाढलेली लोकसंख्या तसेच दैनंदिन पाण्याची गळती लक्षात घेऊन महापालिकेने जलसंपदा विभागाकडे जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीसाठी पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानुसार, पालिकेकडून शहरासाठी २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली होती. पण जलसंपदा विभागाने महापालिकेस १४.६१ टीएमसी पाणी मंजूर करत पुन्हा एकदा महापालिकेची बोळवण केली आहे. तसेच, महापालिकेने मंजूर कोटया एवढेच पाणी दररोज वापरावे असेही पालिकेस बजाविण्यात आले आहे. हे पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडून सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर करणे आवश्यक असताना तब्बल साडेचार महिने उशीराने पाणीकोटा मंजूर केला आहे.
जलसंपत्ती नियामक प्राधिकणाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून दरवर्षी पाटबंधारे विभागास पाण्याचे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, जुलै ते आॅगस्ट अखेर या कालावधीत महापालिकेकडून हे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिकेने आॅगस्ट २०२४ मध्ये ते जलसंपदा विभागास सादर केले. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये या अंदाजपत्रकास मान्यता देत महापालिकेच्या पाण्याच्या मागणीला कात्री लावत पालिकेस १४.६१ टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. तसेच ११३४ एमएलडी पाणी दिले जाणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या मागणीला कात्री
समाविष्ट गावासहित ७९ लाख ३९ हजार लोकसंख्या गृहीत धरून हे अंदाजपत्रक पुणे महापालिकेने सादर केले होते. त्याआधीच्या वर्षी महापालिकेने २०.९० टीएमसी पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र जलसंपदा विभागाने १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले होते. यावर्षी जलसंपदा किती पाण्याचा कोटा मंजूर करणार, याकडे महापालिकेचे डोळे लागून राहिले होते. मात्र, यंदाही महापालिकेच्या वाढीव पाण्याच्या मागणीला कात्री लावत पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. या पाण्याच्या अंदाजपत्रकात समाविष्ट गावासह, शहरातील पाण्याची गळती ३५ टक्के, या गावांमध्ये टॅंकरने मोठया प्रमाणात होणारा पाणी पुरवठा तसेच लोकसंख्या वाढल्याने महापालिकेने ही वाढीव पाण्याची मागणी केली होती.
फेब्रुवारीतच संपणार पाणी कोटा
एका बाजूला जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी जून २०२५ अखेर पर्यंत किती पाणी वापराचे याचा पाणी कोटा निश्चित केला असला तरी दुसऱ्या बाजूला महापालिकेस मंजूर करण्यात आलेला पाणीकोटा फेब्रुवारी अखेरच संपण्याची शक्यता आहे. महापालिकेला शहरासाठी महिन्याला दिड टीएमसी पाणी लागते. तर दिवसाला हे प्रमाण सरासरी १७०० ते १८०० एमएलडी आहे. त्यामुळे हा कोटा फेब्रुवारी अखेरच संपणार आहे. त्यातच, काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीपूर्वी शहरात दररोज १९०० ते २ हजार एमएलडी पाणी प्रतिदिन दिले जात होते. त्यामुळे, निवडणूकांच्या आधी आणि नंतर काही दिवस पालिकेने मोठया प्रमाणात पाणी उचलेले आहे. त्याचा फटका बसू शकतो.