पुणे – “छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबत गणेशोत्सव मंडळांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत आठ दिवसांत निर्णय घेऊन मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे,’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप गणेश मंडळ प्रतिनिधींनी घेतला होता. यावर महापौरांनी हे काम तातडीने बंद करण्याचे निर्देश देत मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची बैठक घेतली जाईल, असे सांगितले होते.
त्यानुसार महापौर निवास येथे ही बैठक झाली. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, कॉंग्रेस गटनेते आबा बागुल, मेट्रोचे अतुल गाडगीळ, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.