पुणे – स्थापनेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त डेक्कन कॉलेजतर्फे नवे चार पदव्युत्तर कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठाची शैक्षणिक परिषद, व्यवस्थापन परिषद आणि राज्याचा उच्च शिक्षण विभाग यांच्या मान्यतेनंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
याविषयी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रमोदकुमार पांडे यांनी ही माहिती दिली. यावेळी विद्यापीठातील प्रा. प्रसाद जोशी, प्रा. सोनल कुलकर्णी, प्रा. पी. डी. साबळे, डॉ. तृप्ती मोरे आणि डॉ. श्रीकांत गणवीर उपस्थित होते.
डेक्कन कॉलेजच्या 200 व्या स्थापना दिनानिमित्त वर्षभर व्याख्यानमाला, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 6 ऑक्टोबर या स्थापनादिनी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे प्रा. पांडे यांनी सांगितले. देशात पुरातत्त्व, मानवशास्र, भाषाशास्त्र, संस्कृत कोशशास्त्र या विषयातील उच्च शिक्षणासाठी डेक्कन कॉलेज प्रसिद्ध आहे.
या विषयातील अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे सुुरू आहेत. तसेच पुरातत्त्व आणि भाषाशास्त्र विभागात प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमदेखील सुरू आहेत.
यावर्षीपासून पर्यावरणीय पुरातत्त्व (एन्व्हायर्नमेंटल आर्कियॉलॉजी), संगणकीय भाषाशास्त्र (कॉम्प्युटिशनल लिंग्विस्टिक्स), वस्तुसंग्रहालय शास्त्र (म्युझिऑलॉजी), वारसास्थळ व्यवस्थापन आणि वैज्ञानिक संवर्धन (हेरिटेज साइट्स मॅनेजमेंट अँड सायंटिफिक कन्झर्वेशन) हे कोर्स सुरू करण्यात येणार असल्याचे प्रा. पांडे यांनी सांगितले.
निधीसंकलनाचे प्रयत्न
डेक्कन कॉलेज कर्मचाऱ्यांचे वेतन राज्यसरकार देते. सध्या कॉलेजने वेगवेगळ्या स्रोतांकडून निधी संकलन आणि आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉलेजचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी जोमाने प्रयत्न आवश्यक आहेत. यामध्ये विविध कंपन्या, माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजसाठी मदत करावी,
असे आवाहन प्रा. पांडे यांनी यावेळी केले.