पुणे – ऐतिहासिक वास्तू असलेली आणि नेहमी गर्दीने भरलेले पुणे रेल्वे स्थानक मागील ९९ वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेसाठी अभिमानाने सज्ज आहे. दि. २७ जुलै रोजी या स्थानकाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले.
महाराष्ट्रासह विविध राज्यांना जोडणारी, सर्वसामान्यांपासून फर्स्ट क्लास आणि हायक्लास प्रवाशांची जीवनवाहीनी म्हणजे रेल्वे. त्यामध्ये मध्य रेल्वेतील पुणे विभागात असलेले एतिहासिक पुणे रेल्वे स्थानकाचे पहिले डिझाइन १९१५ मध्ये तयार झाले. या वास्तूचे काम पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९२२ मध्ये सुरू झाले.
तर, १९२५ मध्ये काम पूर्ण होऊन २७ जुलै १९२५ रोजी तत्कालिन गव्हर्नरने स्थानकाचे उद्घाटन केले. १८५३ मध्ये भारतात बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून झाला. सध्या पुणे स्थानकातून २०० हून अधिक ट्रेन्सद्वारे लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. याशिवाय लोकलदेखील धावतात. लंडनमधील ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला.
“पुणे स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सध्याचे रेल्वे स्थानक बहुमजली केल्यास एकाच ठिकाणाहून लोकल, मेट्रो, बस आणि अन्य वाहतूक होऊ शकते.” – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप.