पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणि संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाचे पडसाद पुण्यात उमटले खरे. मात्र, मूळ वाद बाजूला पडून भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांमध्येच वैयक्तिक टीकाटिप्पणी केल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी, असा प्रकार पाहायला मिळाला.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्या विरोधात आंदोलन केले. भिडे यांच्या प्रतिमेला काळे फासून, जोडे मारो आंदोलन काँग्रेसच्या वतीने फडके हौद चौकात करण्यात आले. सरकारमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. या आंदोलनात काँग्रेसचे शहर पदाधिकारी सहभागी झाले होते.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ‘खबरदार, हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईन – स्वामी विवेकानंद’ हे वाक्य लिहिलेले पोस्टर्स शहरभर लावले आहेत. काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घाटे यांनी लावलेल्या पोस्टर्सबाबत पत्रकारांनी विचारले असता, भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो. त्याचा एकजण मर्डर करणार होता, त्याला विचारा, तुझे वागणे काय आहे? तू फिरू शकतोस का संरक्षणाशिवाय? कधी तू मरशील हे माहिती नाही. कारण तुझी कर्मच तशी आहेत. जशी कर्म करणार तसे भोगावे लागते, असे उत्तर शिंदे यांनी दिले.
शिंदे यांच्या वक्तव्याने राहुल गांधी यांच्या विरोधातील पोस्टर आणि संभाजी भिडे यांचे वक्तव्य हे विषय बाजूला राहिले आणि काँग्रेस शहराध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरून दोन पक्षांमध्ये जुंपली आहे. शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नाही. त्यामुळे काँग्रेस भवनच्या शंभर मीटर अंतराच्या पुढे हे आंदोलन करण्यात आले.
शिंदे हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. केंद्रामध्ये पप्पू जसे बालिशचाळे करतात, तसा बालिशपणा शिंदे यांनी पुण्यात केला आहे. त्यांनी जे विधान केले आहे, ते पुण्याच्या राजकीय संस्कृतीला, राजकीय परंपरेला शोभणारे नाही. पुणेकर जाणतात आणि शिंदे यांच्या विधानावर मी बोलण्याचे कारण नाही. ते अत्यंत बालिश विधान आहे, अशी प्रतिक्रिया घाटे यांनी दिली आहे.