पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित मूल्यमापन ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. आता या चाचणीच्या गुण नोंदणीसाठी येत्या ५ मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात आलेली आहे. संकलित मूल्यमापन चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. मूल्यमापनांचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र यांचेमार्फत चॅटबॉट संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, यावर शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. चॅटबॉटवर गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकेची लिंकही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र यांचेमार्फत चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. संकलित मूल्यमापन चाचणीच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणे व निकाल जाहीर करणे या सर्व शैक्षणिक बाबी १ मे पर्यंत पूर्ण झालेल्या असणार आहेत.
मुदतीत १०० टक्के शाळांनी गुणनोंदणी करणे अनिवार्य आहे. शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जारी केलेल्या आहेत.