पुणे – तंत्रशिक्षणच्या दहावीनंतरची प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) आणि बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमास ऑनलाइन प्रवेशास अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 3 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावी आणि बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर करणे, तसेच अर्जाची पडताळणी करण्याची मुदत पुन्हा 3 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. याबाबतचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालनालयच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही ट्विट करत मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले. सुधारित वेळापत्रकानुसार आता तात्पुरती गुणवत्ता यादी 5 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. या यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी 6 ते 8 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 9 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती तंत्रशिक्षण संचालनालयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.