पुणे – निवडणुका नसल्याने नगरसेवक नाहीत. त्यामुळे दैनंदिन तक्रारी नेणाऱ्या नागरिकांना महापालिकेचे विभाग प्रमुख जुमानत नसल्याने नागरिक थेट आयुक्तांना भेटू लागले. मात्र, त्यालाही मर्यादा असल्याने नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकारी नेमत स्वतंत्र अभ्यंगत कक्ष केला. मात्र, तक्रारींना येथील विभाग प्रमुखांकडून “कात्रजचा घाट’ दाखविला जात आहे. त्यामुळे हे नागरिक पुन्हा आयुक्तांना भेटायला येत आहेत.
नागरिक दैनंदिन कामाच्या तक्रारी घेऊन महापालिकेत जातात. मात्र, त्यांच्या तक्रारी दाखल करून घेत प्रशासन काहीच करत नसल्याने आयुक्त नागरिकांना महापालिकेत भेटण्याच्या दिवशी हे नागरिक तक्रारी आणत होते. या तक्रारींची संख्या एवढी वाढली, की आयुक्तांना आठवड्यात सहा दिवस त्यांनाच वेळ द्यावा लागत होता. परिणामी, आयुक्तांनी आपल्याच कार्यालयात उपायुक्तांची नियुक्ती करत सोमवारी व गुरूवारी तक्रार निवारण कक्ष केला.
हा कक्ष तक्रार ऐकून घेवून त्यानुसार विभाग प्रमुखांना पत्र पाठवत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देतो. मात्र, त्यानंतर काहीच होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, हे नागरिक या कक्षाकडे त्याच त्याच तक्रारी घेवून येत असून आयुक्तांनाही भेटत आहे. एका नागरिकाने २५ पेक्षा अधिक तक्रारी केल्या होत्या. त्याची सोडवणूक न झाल्याचे आयुक्तांनी त्याची स्वतंत्र एक तासाची बैठक घ्यावी लागली. त्यामुळे आता विभाग प्रमुखांना कारवाईचा इशारा देत तत्काळ तक्रार निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कक्षाचे उपायुक्त अविनाश संकपाळ यांनी हे आदेश काढले आहेत.
या आहेत विभाग प्रमुखांना सूचना
– या पुढे ८ दिवसांच्या आत तक्रार सोडवावी.
– अर्जदारास पूर्ण उत्तर द्यावे
– तक्रारींचा रोज आढावा घ्यावा
– तक्रार एकमेकांकडे पाठवताना पडताळणी करावीव.
– तक्रार सोडविण्यात आल्यानंतर कक्षास कळवावे.